कळंब उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप; रुग्णालय परिसरात तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळंब येथील कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्य केलेले नासर रहमतुल्ला शेख (वय ४२, रा. इंदिरानगर, कळंब) यांचा कळंब उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नासर शेख यांना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नातेवाईकांचा आरोप आहे की, त्यावेळी डॉ. लामतुरे ड्युटीवर असतानाही त्यांनी रुग्णाच्या छातीत दुखत असताना तपासणी न करता मस्त झोपले होते. रुग्णाला कर्मचाऱ्यांमार्फत प्राथमिक औषधोपचार करून घरी पाठविण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अधिकच दुखू लागले प्रकृती अधिकच खालावल्याने सकाळी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयातच चक्कर आली आणि पडले मात्र तोपर्यंत नासर शेख कोमात गेले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नातेवाईक व नागरिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. संतप्त नातेवाईकांनी डॉ. लामतुरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तेथून वेगळ्या रूममधे नेले आणि अनर्थ टळला. यावेळी रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

नातेवाईकांचा आरोप आहे की, पहिल्याच वेळी डॉ. लामतुरे यांनी तपासणी करून योग्य वेळी येथे उपचार होत नसल्यास पुढील उपचारासाठी तातडीने रेफर केले असते, तर नासर शेख यांचा जीव वाचू शकला असता.’ मात्र डॉ. लामतुरे यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. नासर शेख यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून कार्य करत अनेक रुग्णांच्या सेवेत मोठे योगदान दिले होते. अशा व्यक्तीचा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

कठोर कारवाईची मागणी

मृत्यूची बातमी समजताच उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नातेवाईक व नागरिक जमा झाले. नातेवाईकांनी डॉ. लामतुरे यांच्या विरोधात संताप व्यक्त करत निष्काळजीपणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली.