प्रवेश नाकारताच विद्यार्थ्याने वेबसाइट केली हॅक, आयआयटी कानपूरचा कारवाईऐवजी संधी देण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी कानपूरमध्ये ‘बी-टेक सायबर सिक्युरिटी’ या पदवी अभ्यासक्रमाला एका विद्यार्थ्याला प्रवेश न मिळाल्याने त्याने थेट संस्थेची वेबसाईटच हॅक केली. विद्यार्थ्याच्या या कारनाम्यानंतर संस्थेने त्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआयटी कानपूरमध्ये या विद्यार्थ्याला ‘बी-टेक सायबर सिक्युरिटी’ या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. मात्र, प्रवेश परीक्षेत या विद्यार्थ्याला अपयश आले. त्यानंतर या विद्यार्थ्याने कथितरीत्या संस्थेची वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला आणि ‘मला फक्त एक संधी द्या’ असा संदेश दिला. ‘तुमच्या संस्थेची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. पण मला फक्त एक योग्य संधी देण्याचा विचार करावा. वेबसाईटचे कोणतेही नुकसान करण्याचा आपला हेतू नसून आपली सायबर सुरक्षा कौशल्ये दाखवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी, हाच हेतू त्या मागचा आहे,’ असे या विद्यार्थ्याने म्हटले होते. त्यानंतर आयआयटी कानपूरच्या प्रशासनाने सुरुवातीला एफआयआर दाखल करण्याचा विचार केला. मात्र, त्यानंतर या विद्यार्थ्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्याचे भवितव्य आम्हाला धोक्यात आणायचे नाही, असे संचालक मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहे.