पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतरच अमित शहांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याच्या वेळेसच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या पदावरून दूर करायला हवे होते, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केला आहे. जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईच्या मुद्द्यावरून त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संसद मार्ग पोलीस स्टेशनमधील जनरल डायरीमध्ये पॅलेट गनचा वापर केल्याचा आदेश देणाऱ्या डीसीपीची नोंद स्पष्टपणे उपलब्ध आहे आणि दिल्लीचं पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शाह यांना आहे. त्यामुळे जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला मग टिअर गॅस, लाठीचार्ज, पॅलेट गनचा मारा हा अमित शहा यांच्या आदेशाने झाला आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे असंही ते म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतरच अमित शहांना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. पुलवामा आणि पहलगाम हल्ला ज्या प्रकारे झाला, ही जबाबदारी पूर्णपणे अमित शाहांची होती. पण त्यात ते… त्यांना वाचवण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे, सैन्याचा विषय आहे म्हणून विरोधी पक्षाने फार तो विषय ताणून धरला नाही. पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शाहंच्या पदरात टाकावंच लागेल असेही संजय राऊत स्पष्टच बोलले.

जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायर पाहिला, जंतर मंतरवर जनरल कायर बघितला

संजय राऊत पुढे म्हणाले की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही जनरल डायर पाहिला होता. जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. दोन मुद्दे समोर येत आहेत. एक तर त्यांनी हे आदेश दिले का, किंवा त्यांच्या पश्चात त्यांना न सांगता हे सगळं घडलं का? काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झालं असेल, तरीही गृहमंत्री म्हणून जबाबदारी त्यांचीच आहे! याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत, किंवा तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांवर गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात! दोन्ही बाजूंनी जर आपण पाहिलं, तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

जितेंद्र सिंग लिहून दिलेली भाषणं वाचतात

लोकसभेत जितेंद्र सिंग यांनी कुणावरही गोळ्या चालवल्या गेल्या नसल्याचे म्हटले होते, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ते धादांत खोटे बोलत असल्याचा पलटवार केला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेले जितेंद्र सिंग केवळ लिहून दिलेली भाषणे वाचतात, असा टोला त्यांनी लगावला.ज्यांच्यावर विद्यार्थ्यांवर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले, समोर आणले आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनची जनरल डायरी कधीही खोटी ठरू शकत नाही, असे सांगत येत्या काळात त्या डायरीची पाने देखील जगासमोर आणली जातील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.