
कोकणवासीयांचा सर्वात मोठा आणि आस्थेचा असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांहून अधिक कालावधी लोटला तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सर्व ‘डेडलाईन्स’ संपल्या तरी रस्त्याची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे यंदाही गणरायाचे आगमन आणि चाकरमान्यांचा प्रवास अपूर्ण महामार्गावरून आणि खड्ड्यांच्या साखळीतूनच होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम ९९ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे कागदावर दाखवले जात असले, तरी प्रत्यक्ष वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत लटकलेली आहेत. यातच भर म्हणजे सर्व्हिस रोड प्रचंड खड्डेमय झाले आहेत; यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावर कुडाळ तालुक्यातील झाराप या ठिकाणी संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम.
-
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून लाखो चाकरमानी आपल्या गावी येतात. मुंबई-गोवा चौपदरीकरण पूर्ण झाल्यास १२ ते १३ तासांचा प्रवास ६ ते ७ तासांवर येईल, अशी मोठी आशा दाखवण्यात आली होती. परंतु १५ वर्षे उलटूनही महामार्गाची कामे, उड्डाणपुलांचे रखडलेले टप्पे आणि रस्त्यांवरील खड्डे जसेच्या तसे असल्याने यंदाच्या गणेशोत्सवातही जलद आणि खड्डेमुक्त प्रवासाची प्रतीक्षा चाकरमान्यांच्या नशिबी कायम राहणार आहे.
-
संगमेश्वर परिसर आणि इतर ठिकाणी जोडरस्ते, सेवा रस्ते आणि पादचारी मार्गांची कामे रखडल्यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.































































