वसईत मालगाडी डबे सोडून पळाली; तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसईतील मधुबन सिटीजवळ धावत्या मालगाडीचे डबे विभक्त झाल्याची घटना घडली. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मधुबन सिटीलगत असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) मार्गावर हा प्रकार घडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मालगाडीचे दोन भाग वेगळे झाल्याचे तसेच त्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी डबे पुन्हा जोडण्याचे काम करतानाची दृश्ये दिसत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मालगाडी दादरी (दिल्ली परिसर) येथून नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT)कडे जात होती. घटना घडल्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मालगाडीची तपासणी केली. त्यानंतर विभक्त झालेले डबे सुरक्षितरीत्या पुन्हा जोडण्यात आले आणि सुमारे 30 ते 45 मिनिटांत मालगाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची नोंद नाही.

दरम्यान, मालगाडीचे दोन भाग नेमक्या कोणत्या कारणामुळे विभक्त झाले, याबाबत रेल्वे प्रशासन किंवा डीएफसीसीआयएल (DFCCIL) यांनी अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. रेल्वेच्या तांत्रिक तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.