
सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई पुन्हा प्रवाहित झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला प्रवाह आता वेगाने वाहू लागल्याने परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे राजापूर गंगा परिसरात पुन्हा एकदा भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.
यावर्षी ८ जुलै रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मूळ गोमुखातून अल्प प्रमाणात सुरू झालेला प्रवाह गेल्या काही दिवसांपासून वाढला असून पावसामुळे त्यात अधिक भर पडली आहे. सध्या गोमुखातून सातत्याने वाहणारे पाणी आणि भरलेली कुंडे पाहण्यासाठी नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. राजापूर गंगा हे कोकणातील एक अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य मानले जाते. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या या स्थळाला विशेष महत्त्व आहे. पूर्वी गंगामाईचे आगमन ठराविक कालावधीत होत असे. डिसेंबर किंवा जून महिन्यात प्रकट होऊन ती दोन ते आठवडे प्रवाहित राहत असे. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी गंगामाईचे आगमन होण्याची परंपरा होती. मात्र गेल्या दोन दशकांत या चक्रात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी गंगामाईच्या आगमनामुळे देशभरातून हजारो भाविक राजापूरमध्ये दाखल होत असत. स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक लाभ होत असे. मात्र आता गंगामाईचे आगमन वारंवार होत असल्याने त्याबाबतचे आकर्षण काहीसे कमी झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे या नैसर्गिक घटनेमागील भूगर्भशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि पर्यावरणीय कारणांचा सखोल अभ्यास करण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गंगामाईच्या पुनःप्रवाहामुळे राजापूरकरांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काही दिवस भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


























































