
विरार पश्चिमेतील एका खासगी रुग्णालयात धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय हलगर्जीपणामुळे उभ्यानेच गर्भवतीची प्रसुती झाली आणि नवजात बालक थेट जमिनीवर पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात ही घटना घडली.
पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व परिचारिकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला बुधवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी तिला जोगळेकर रुग्णालयात दाखल केले. गर्भवतीने वारंवार डॉक्टर व परिचारिकांना बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, तिच्या तक्रारीकडे डॉक्टर आणि परिचारिकांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, महिला उभी असतानाच तिची प्रसूती झाली आणि नवजात बालक सुमारे अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेत बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील विशेष नवजात अतिदक्षता विभागात (NICU) हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित डॉक्टर व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत रुग्णालयाचे डॉ. जोगळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यास नकार दिला. या गंभीर घटनेची आरोग्य विभागाने सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिक व नातेवाईकांकडून केली जात आहे.


























































