
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची देखभाल, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी, मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील. माटुंगा येथून पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर लाईनवर लोकल सेवा रद्द
ब्लॉक कालावधीत हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी ते वांद्रे दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील गाड्या आणि सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील गाड्या रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम लाईन वरून प्रवास करण्याची मुभा असेल.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक
रुळांची देखभाल, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी, मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री 00.25 ते 04.25 या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गांवर हा जंबो ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकच्या कालावधीत, जलद मार्गावरील सर्व गाड्या चर्चगेट आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.



























































