इन्कम टॅक्स भरणारे 94 हजार शेतकरी अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली तेव्हाच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले होते. तसेच करदात्या शेतकऱ्यांची माहितीही केंद्र सरकारकडून मागवली होती. 31 लाख 64 हजार 28 शेतकऱयांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली गेली. त्यात 94 हजार शेतकरी हे करदाते असल्याचे समोर आले.

या योजनेद्वारे राज्यातील 56 लाख शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजनेसाठी 36 हजार 585 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. 56 लाखांपैकी 32 लाख शेतकरी हे थकबाकीदार गटातील आहेत. तर वेळेवर आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱया 24 लाख शेतकऱयांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच 2 लाख 90 हजार शेतकऱयांकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असून त्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

कर्जमाफीचे पैसे पाच दिवसांत खात्यात जमा होणार

94 हजार करदाते शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरल्याने राज्य शासनाच्या तिजोरीतील 1 हजार 881 कोटी 66 लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या यादीतील शेतकऱयांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच पुढील 5 दिवसांत लाभाची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे.