Mumbai Mega Block – मध्य रेल्वेच्या लोकल उद्या धिम्या ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. या ब्लॉक काळात मेन लाईनवरील सर्व जलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. जलद आणि धिम्या लोकल एकाच मार्गावरून धावणार असल्याने मेन लाईनच्या प्रवाशांची रविवारच्या लोकल प्रवासात गैरसोय होण्याची शक्यता आहे.

माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱया जलद मार्गावरील गाडय़ा माटुंगा येथून डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून पुढे जाणाऱया जलद गाडय़ा मुलुंड येथून पुन्हा जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱया अप जलद गाडय़ा मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉक काळातील या बदलामुळे सर्वच लोकल गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात अनेक लोकल फेऱया रद्द केल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. रात्री 12.25 ते पहाटे 4.25 या वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट आणि सांताक्रूझ दरम्यान जलद गाडय़ा धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.