
<< राखी अरदकर
[email protected]
धावपळीच्या आयुष्यात आपण इतके गुंतून जातो की, मोकळा श्वास कधी घेतला, हेही आठवत नाही. मनावर ताण, डोक्यात असंख्य विचार आणि वेळेच्या मागे धावताना निसर्गाशी असलेले आपले नाते नकळत दूर होत जाते. पण एकदा का आपण पहाटेच्या शांत वातावरणात, हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात किंवा निळ्याशार आकाशाखाली काही क्षण थांबलो, की मनाला एक वेगळीच शांतता लाभते. त्या शांततेतच मोकळ्या श्वासाचा आणि खऱ्या आनंदाचा शोध सापडतो. पहाटेची ती कोवळी किरणे अलगद पृथ्वीच्या कुशीत उतरतात, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर पडतो, झाडांच्या पानांतून वाहणारा मंद वारा चेहऱ्याला स्पर्श करून जातो आणि नकळत एक दीर्घ श्वास घेतला जातो. तो श्वास निसर्गाच्या जिवंत स्पंदनांचा, शांततेचा आणि नव्या जीवनाचा. निसर्ग माणसाला त्याचा प्रत्येक रंग, प्रत्येक ऋतू आणि प्रत्येक क्षण काहीतरी सांगून जातो. हिरवीगार झाडे सांगतात, दगड झेलूनही सावली द्यावी. नदी शिकवते अडथळे आले तरी वाहत राहावे. पर्वत शिकवतात वादळे आली तरी ठाम उभे राहावे आणि आकाश शिकवते मन विशाल ठेवले की प्रत्येक दुःख लहान वाटू लागते.
आकाशाकडे पाहताना मनाला मर्यादा उरत नाहीत. त्याच्या अथांग निळाईत आपल्या चिंता विरघळून जातात. ढग येतात, पाऊस पडतो, पुन्हा निरभ्र आकाश दिसते. जीवनही असेच असते. संकटांचे ढग कायमचे राहत नाहीत. प्रत्येक अंधारानंतर नव्या प्रकाशाची चाहूल लागते. सूर्य हा अखंड ऊर्जा, आशा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे. तो रोज उगवतो, कोणताही मोबदला न मागता संपूर्ण सृष्टीला प्रकाश देतो. त्याच्या प्रत्येक किरणात नवे स्वप्न असते, नवी उमेद असते आणि नव्याने जगण्याची प्रेरणा दडलेली असते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सुखाचा शोध बाहेर घेत राहतो. पण खरे समाधान निसर्गाच्या सहवासात सापडते. काही क्षण हिरवाईत बसणे, आकाशाकडे शांतपणे पाहणे, सूर्याच्या ऊबदार किरणांचा स्पर्श अनुभवणे किंवा फक्त मोकळा श्वास घेणे, इतकेच पुरेसे असते मन पुन्हा प्रसन्न होण्यासाठी.
निसर्ग आपल्याला शिकवतो की, आनंद विकत मिळत नाही. तो अनुभवावा लागतो. शांतता शोधावी लागत नाही. ती मनाला निसर्गाशी जोडली की आपोआप सापडते. माणूस जितका निसर्गाच्या जवळ जातो, तितका तो स्वतच्या जवळ येतो. वेळ मिळेल तेव्हा निसर्गात जा. मोकळा श्वास घ्या. आकाशाच्या विशालतेत स्वतला हरवून द्या. सूर्याच्या ऊर्जेतून नव्या दिवसाची प्रेरणा घ्या. कारण निसर्ग जीवनाला नव्याने जगण्याची शिकवण देणारा सर्वात मोठा गुरू आहे. त्याच्या सान्निध्यातले काही क्षण मनाला शांत करतात, नव्या विचारांची ऊर्जा देतात आणि जगण्याचा खरा आनंद काय असतो, याची जाणीव करून देतात.
रोज थोडा वेळ निसर्गासाठी राखूया. मोकळा श्वास घेऊया, आकाशाकडे पाहूया, झाडांशी, पक्ष्यांशी आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांशी पुन्हा एकदा मैत्री करूया. कारण निसर्ग आपल्याला आनंदाने, समाधानाने आणि मनापासून जगायला शिकवतो.


























































