
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेत वर्चस्व निर्माण करण्यासाठी खेळाडूंचा सध्या सराव सुरू आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात संघ श्रीलंकेला पराभवाची धुळ चारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा हादरा बसला आहे. टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या पूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.
T20 विश्वचषकादरम्यान जसप्रीत बुमराहच्या गुडख्याला दुखापत झाली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यात कार्डिफ येथे 16 जुलै रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यालाही मुकावे लागले होते. इंग्लंड दौरा संपल्यानंतर त्याच्यावर विशेष उपचार करण्यात आले असून, गुडघ्यात इंजेक्शनही देण्यात आले आहे. बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सेलन्समध्ये फिटनेस चाचणी घेतल्यानंतर, जर त्याने आताच गोलंदाजी सुरू केली तर दुखापत बळावण्याचा धोका असल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यातील मोठा काळ लक्षात घेता आणि वर्कलोड मॅनेजमेंटसाठी बोर्डाने कोणतीही रिस्क न घेता त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवले आहे.
बुमराहसोबतच हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर आणि आकाश दीप हे प्रमुख खेळाडूही विविध दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत. या वाढत्या दुखापतींमुळे कर्णधार शुभमन गिलसह संघव्यवस्थापनाची चिंता मोठी झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील 14 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून, केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.























































