
गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचा मनोदय शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त करीत आवाजाच्या भिंती कुठल्याही मंडळांकडून लावल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मंडळांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव मंडळांना पाच दिवस आगमन मिरवणुकीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी स्पष्ट केले.
शहर व शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस करमणूक केंद्रातील अलंकार हॉल येथे शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांची बैठक आयोजिली होती. या बैठकीत आगमन मिरवणुकीत आवाजाच्या भिंतींना परवानगी नसल्याचे पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी विविध मंडळांच्या पदाधिकाऱयांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गणेश आगमन मिरवणुकांच्या तारखांबाबत शहर गणेशोत्सव समन्वय समिती यांच्याकडून सर्व मंडळांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर पाच दिवस मंडळांना बाप्पांच्या आगमनासाठी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व शाहूपुरी पोलीस निरीक्षक शेजवळ उपस्थित होते.



























































