लोकशाहीच्या बळकटीसाठी न्यायव्यवस्था पारदर्शक हवीच, जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी अजून बरंच काही करणे बाकी; सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे व्यवस्थेवर भाष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

न्यायमूर्तींच्या नियुक्ती प्रक्रियेवरून कॉलेजियमवर सडकून टीका करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी रविवारी न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेच्या अभावावर बोट ठेवले. घटनात्मक लोकशाहीच्या बळकटीसाठी न्यायव्यवस्था पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. जनता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवते. ते लक्षात घेता न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अजून बरंच काही करणे बाकी आहे, असे सडेतोड भाष्य न्यायमूर्ती भुयान यांनी केले. ‘विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी’च्या अहवाल प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

…तर न्यायाधीश निष्पक्ष, तटस्थपणे कर्तव्य बजावतील

कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी तसेच सामाजिक रचनेतील स्थिरता राखण्यासाठी न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खुली न्यायालये लोकांचा विश्वास वाढवतात. पक्षकार आणि सामान्य जनतेला न्यायालयीन कामकाज पाहण्याची मुभा दिल्यास न्यायाधीश कायद्याची अंमलबजावणी निष्पक्ष आणि तटस्थपणे करतील, असा विश्वासही न्यायमूर्ती भुयान यांनी व्यक्त केला.  

बंद लिफाफ्यातून माहिती लपवून का ठेवली जाते?

न्यायमूर्ती भुयान यांनी न्यायालयात बंद लिफाफ्यातून माहिती सादर करण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत दुसऱ्या पक्षापासून माहिती लपवून ठेवली जाते. ही पद्धत कायद्यापुढे समानतेच्या हमीचे उल्लंघन करीत नाही का? निष्पक्षता व खुल्या न्यायदानाची प्रक्रिया यांसारख्या घटनात्मक तत्त्वांशी ही पद्धत कितपत सुसंगत आहे? असे सवाल करतानाच त्यांनी न्यायालयांत बंद लिफाफ्याची पद्धत सुरू ठेवण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.