
>> सोनिया राव, (शिक्षिका)
भारतीय समाजात आजही ‘मुलगाच हवा – वंशाचा दिवा’ ही विचारसरणी खोलवर रुजलेली दिसते. पूर्वीच्या काळात मुलगा हा कुटुंबाचा आधार मानला जात असे. वंश पुढे नेणे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे आणि वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे ही कामे मुलानेच करावीत, असा समज होता. त्यामुळे मुलाला अधिक महत्त्व दिले जात असे. मुलगा आणि मुलगी यांच्यात तुलना करताना अनेकदा मुलाला अधिक महत्त्व दिले जाते, तर मुलीकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. ही असमानता आजच्या आधुनिक युगातही पूर्णपणे नाहीशी झालेली नाही, ही खेदाची बाब आहे.
आजचा काळ बदलला आहे. शिक्षण आणि संधी मिळाल्यामुळे मुलीही प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. विज्ञान, क्रीडा, प्रशासन, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अनेक मुली आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतात आणि आई-वडिलांचा आधार बनतात. त्यामुळे ‘वंशाचा दिवा’ ही संकल्पना फक्त मुलापुरती मर्यादित ठेवणे योग्य नाही.
घरामध्येही मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. मुलाला स्वातंत्र्य, मोकळेपणा आणि कमी नियम असतात, तर मुलीवर अनेक बंधने घातली जातात. तिच्या वागण्या-बोलण्यावर, कपडय़ांवर आणि वागणुकीवर नियम लादले जातात. ‘हे करू नको’, ‘तिथे जाऊ नको’ असे निर्बंध मुलींसाठीच जास्त असतात. याउलट मुलांना मात्र मोकळीक दिली जाते. आई-वडील आणि नातेवाईक यांचाही दृष्टिकोन अनेकदा वेगळा असतो. मुलगा झाला तर आनंदोत्सव साजरा केला जातो, तर मुलगी झाली तर काही ठिकाणी निराशा व्यक्त केली जाते. काही ठिकाणी तर मुलगी नकोशी वाटते आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे गर्भातच मुलींची हत्या करण्यासारखे अमानुष प्रकार घडतात.
शाळा, समाज आणि नोकरीच्या ठिकाणीही मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षक, शेजारी किंवा सहकारी यांच्याकडून कधी कधी मुलींना कमी लेखले जाते किंवा त्रास दिला जातो. त्यांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा सामाजिक समारंभांमध्ये मुलांना पुढे केले जाते, तर मुलींना मागे ठेवले जाते.
मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मुलगी ही कुटुंबाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तिच्या शिक्षणाला, स्वप्नांना आणि क्षमतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. समानतेचा विचार स्वीकारल्यासच समाज अधिक सक्षम आणि प्रगत होईल. मात्र आजच्या काळात मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत. त्या शिक्षण, क्रीडा, विज्ञान, व्यवसाय आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रांत यशस्वी होत आहेत. त्यामुळे ‘वंशाचा दिवा’ ही संकल्पना केवळ मुलापुरती मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. मुलगा-मुलगी दोघांनाही समान संधी, समान वागणूक आणि समान सन्मान मिळाला पाहिजे. ‘मुलगाच हवा’ या विचाराऐवजी ‘मुलगीही तितकीच महत्त्वाची आहे’ हा विचार स्वीकारल्यासच खऱया अर्थाने समाज प्रगत होईल.






























































