
नुकतीच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने आणि राम मंदिर देणगीतील गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘सरकारने सरकारची जबाबदारी पार पाडली पाहिजे,’ असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना डिंपल यादव म्हणाल्या की, विरोधी पक्ष सरकारला जाब विचारत असून जनतेशी संबंधित मुद्दे मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
“गदारोळ कोण करत आहे? गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावे अशी आमची इच्छा आहे, पण कोणीही येत नाही. आम्हाला देणगी चोरीच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. पण हे लोक तसे करत नाहीत. याचा अर्थ असा नाही की आम्ही शांत बसू. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावू, पण सरकारमध्ये असताना तुम्ही सरकारची भूमिका बजावली पाहिजे,” असा घणाघात यादव यांनी केला.




























































