
तिखट, तेलकट सावजी मटण खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन आणि इस्पितळात जावे लागेल, असे विधान अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथे केले होते. ‘सावजी’प्रेमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ते चांगलेच झोंबले आहे. सावजी ही विदर्भाची शान आहे, रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका, असा दमच त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भरला.
तुकाराम मुंढे यांच्या विधानाबद्दल सावजी रेस्टॉरंट चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा हा रोजगाराचा आधार असून व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल, अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत.
विदर्भात सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धत आहे. देशामध्ये सावजीच्या पदार्थांना मोठी मागणी असताना, एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगावर अशी टिप्पणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे. अन्नात कुठे भेसळ किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट आढळल्यास त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचीही अडचण नाही. परंतु रेस्टॉरंट्स बंद पडतील, अशी वक्तव्ये अधिकाऱ्यांनी टाळावीत, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिला.
मला आवडले नाही, पण कोणी खाऊ नका बोललोच नाही – मुंढे
तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतच स्पष्टीकरण दिले होते. एका मित्राच्या आग्रहास्तव आपण सावजी मटण खायला गेलो होतो; परंतु ते खूप तिखट आणि तेलकट असल्याने मला आवडले नव्हते. त्यामुळे मी ते विधान केले होते. पण इतरांनी कोणी सावजी खाऊ नये किंवा ते खराब आहे असे कुठेही आपण म्हटलेले नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले होते.























































