
‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे मुख्य समन्वयक अभिजीत दीपके यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भेटायला आलेल्या नागरिकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत होती. तुम्ही का आलात? कशाला आलात? कुठून आला? अशा प्रकारची माहिती घेऊन दिपके यांना भेटण्यापासून नागरिकांना रोखले जात होते, असा आरोप होत आहे. एकूणच पोलिसांच्या भूमिकेवर अभिजीत दिपके यांनीही आक्षेप घेतला आहे. तर अभिजीत दिपके यांना नजरकैद करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरातील सिडको वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे मुख्य समन्वयक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या कामकाजावर दीपके यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पीएसआय सुरेश सांगळे यांना थेट घराबाहेर जाण्यास सांगितले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवरील आंदोलन आणि पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीनंतर अभिजीत दीपके यांना भेटण्यासाठी विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भेटीसाठी येणाऱ्यांची ओळख पडताळणी आणि चौकशी केली जात असल्याने काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याच मुद्द्यावरून दीपके आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला.
यावेळी दीपके यांनी पोलिसांवर भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांशी अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप केला. “माझ्या घरी कोण येणार आणि कोणाला भेटायचे, याचा निर्णय मी घेईन… तुम्ही कोण ठरवणारे? नागरिकांशी अशा प्रकारे वागण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही येथून निघून जा,” असे सांगत अभिजीत दिपके यांनी पीएसआय सुरेश सांगळे यांना घराबाहेर जाण्यास सांगितले.




























































