‘पुरी दाल ही काली है’, ई-२० धोरणावर राहुल गांधींची टीका 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 “ई-२० पेट्रोल हे छोटे प्रकरण नाही. या ई-२० इंधनामुळे सर्वसामान्य लोकांच्या कार आणि स्कूटरचे इंजिन खराब होत आहे. सरकार लोकांच्या खिशावर अतिरिक्त ओझे टाकत आहे. या प्रकरणात ‘दाल में कुछ काला नहीं, बल्कि पूरी दाल ही काली है’,” अशी जोरदार टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ‘एक्स’ (X) वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी कारचे ‘फ्यूएल कॅप’ (Fuel Cap) उघडताना दिसत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ई-२० धोरणामुळे सामान्य जनतेला कोणता फायदा झाला, याचे स्पष्ट उत्तर सरकारकडून दिले जात नाही. उलट ई-२० मुळे जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा टाकला जात आहे,” असे राहुल गांधी यांनी सांगितले.

“देशात सध्या भ्रष्टाचाराचे इतके मुद्दे आहेत की कोणत्या विषयावर आधी बोलायचे, याचा निर्णय घेणे अवघड बनले आहे. मात्र जनतेने चिंता करण्याची गरज नाही, कारण हे सर्व मुद्दे आपण मांडू आणि सरकारला यावर जाब विचारू,” असेही राहुल गांधी म्हणाले.