
चीनकडून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ सातत्याने कुरापती करण्यात येतात. त्यामुळे केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशमधील 27 ठिकाणे आणि तेथील भौगोलिक वैशिष्टय़े अधिकृत नकाशात नोंदवली आहेत. अरुणाचल प्रदेश सरकारच्या सल्ल्यानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चीनच्या नाव बदलण्याच्या खेळीला हिंदुस्थानकडून नकाशावर अधिकृत नोंदी आणून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
चीनकडून अरुणाचल प्रदेशवर सातत्याने दावा करण्यात येतो. तेथील अनेक ठिकाणांची नावे बदलल्याचे चीन जाहीर करतो. हिंदुस्थानकडून हे प्रयत्न खोडले जातात. आता केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशबाबत नवे पाऊल उचलले आहे. अरुणाचल प्रदेशातील छोटा पुंदुन, बडा पुंदुन, रामनगर, सम्भो सरोवर, लोंगजू खिंड, शेर-ए-थापा स्मारक, शिवाजी नगर, कामलांग नगर यासह 27 ठिकाणे देशाच्या अधिकृत नकाशात जोडली असून या ठिकाणांचे महत्त्व आणि वैशिष्टय़े ठळकपणे मांडली आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामात सुधारणा होईल. तसेच सरकारी नोंदींमध्ये एकरुपता येईल. या ठिकणांची माहिती हिंदुस्थानच्या प्रशासनिक रेकॉर्डमध्ये नोंदविली जाईल. ही ठिकाणे प्रत्यक्ष ताबारेषेपासून अतिशय जवळ आहेत.
चीनकडून अरुणाचलमध्ये घुसखोरीचा दावा
चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करत काही भागावर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. सुबनसिरी या भागावर चीनने ताबा घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मात्र, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या चर्चा फेटाळल्या असून चीनने ताबा मिळवल्याचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानी लष्करानेदेखील जून महिन्यात हे दावे फेटाळले होते.






























































