मुलुंड रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडल्याने आग; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात सोमवारी बांधकामाचे साहित्य थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याची घटना घडली, ज्यामुळे वायरला आग लागली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. साहित्याचा ओव्हरहेड वायरशी थेट संपर्क आल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्याने ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. ओव्हरहेड वायर आणि आसपासच्या यंत्रणेची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, अचानक लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. गाड्या दीर्घकाळ उभ्या राहिल्याने कंटाळलेल्या अनेक प्रवाशांना नाईलाजाने रेल्वे रुळावरून चालत आपला पुढील प्रवास किंवा मार्ग काढावा लागला. नंतर दुपारी 12.15 वाजेपर्यंत ओव्हरहेड यंत्रणेवरील वायरचा तुकडा काढण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांतच उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

पश्चिम रेल्वेवर विविध ठिकाणी पॉइंट्स बिघाड झाल्यामुळे लोकल गाड्या दुपारपर्यंत किमान 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत होत्या. ग्रँट रोड आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला पॉइंट्स बिघाड पालघर जिल्ह्यातील वसई रोड येथे पहाटे 4 वाजून 46 मिनिटांनी झाला. त्यानंतर मुंबईतील दादर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी आणि गोरेगाव येथे सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी आणखी दोन बिघाड झाले. दादर येथील बिघाडामुळे अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवरील सेवा विस्कळीत झाली, तर गोरेगाव येथील बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. यासोबतच मध्य रेल्वेवरही तांत्रिक बिघाडाची भर पडली.