
शाळेत शिक्षक नाहीत म्हणून शिक्षण थांबवायचे नाही, तर शिक्षक मिळवण्यासाठी थेट शिक्षण विभागाच्या दारात पोहोचायचे, असा निर्धार परमडोहच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवला. शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न वारंवार मांडूनही तो सुटत नसल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने थेट यवतमाळ गाठत शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
परमडोह येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. यापूर्वी पंचायत समिती स्तरावर निवेदन देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची भेट घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील अडचणी आणि शिक्षकांची गरज शिक्षणाधिकाऱ्यांसमोर मांडली. “आम्हाला शिक्षक हवेत, आमचे शिक्षण थांबू नये,” अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हा थेट आणि आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने तातडीने दखल घेतली.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी परमडोह शाळेसाठी एका शिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनी केलेली यवतमाळवारी अखेर यशस्वी ठरली.
निवेदनांपासून थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनाच्या केंद्रस्थानी आणला. ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, “शिक्षक नसतील तर आवाज उठवू, पण शिक्षण थांबू देणार नाही,” असा संदेश परमडोहच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.


























































