
इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याने आखातात युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर संकट घोंघावत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. नाटो शिखर परिषदेसाठी तुर्कीयेला गेलेल्या ट्रम्प यांची इराणकडून हत्या होण्याचा धोका निर्माण झाला होता. परिस्थिती गंभीर झाल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी सिक्रेट मिशन राबवत डोनाल्ड ट्रम्प यांना तुर्कीयेतून अत्यंत गोपनीय पद्धतीने बाहेर काढण्यात आले होते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने डोनाल्ड ट्रम्प तुर्कीयेतून कसे बाहेर पडले याची सविस्तर माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तुर्कीयेला आले होते. गेल्या महिन्यात 8 जुलै रोजी नाटो शिखर परिषदेमध्ये सहभागी झाल्यानंतर ट्रम्प अंकारा विमानतळावरून एअर फोर्स वनमध्ये बसताना दिसले. कॅमेऱ्यासमोर विमानात प्रवेश केल्यानंतर ट्रम्प यांना विमानातील कॅटरिंगच्या ट्रकमध्ये लपवून तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सी-32ए या छोट्या सैन्य विमानापर्यंत नेण्यात आले आणि तिथून त्यांना गुप्तपणे थेट ब्रिटनला पोहोचवण्यात आले. विशेष म्हणजे हे मिशन एवढ्या गुपचूप राबवण्यात आले की पत्रकार आणि अधिकाऱ्यांनाही याचा सुगावा लागला नाही.
अमेरिकन सैन्याने ट्रम्प यांनी तुर्कीयेतून कसे बाहेर काढले?
- ट्रम्प यांनी तुर्कीयेतील अंकारा येथील विमानतळावर पत्रकारांसमोर आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रसिद्ध निळ्या-पांढऱ्या एयर फोर्स वन या मुख्य विमानात प्रवेश केला.
- विमानात चढल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांना गुपचूप विमानतळावरील कॅटरिंग ट्रकमध्ये बसवले. तिथून त्यांना सी-32ए या अमेरिकन सैन्याच्या लहान विमानात हलवण्यात आले.
- एयर फोर्स वन विमानात उपस्थित असलेले पत्रकार आणि काही व्हाईट हाऊस कर्मचाऱ्यांना ट्रम्प विमानातच आहेत असे वाटत होते.
- सुरक्षेचे कारण सांगून पत्रकारांना विमानाच्या खिडक्यांचे पडदे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
- सी-32ए या लहान विमानाने ट्रम्प यांना सुरक्षितपणे ब्रिटनच्या आरएएफ मिल्डेनहॉल या लष्करी तळावर पोहोचवले. त्याच्या अवघ्या काही मिनिटांनंतर एयर फोर्स वन विमानही तिथे उतरले.
पत्रकारांच्या प्रश्नावर काय म्हणाले ट्रम्प?
दरम्यान, ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकारांनी विमानाच्या खिडक्यांचे पडदे बंद ठेवण्याबाबत विचारले असता ट्रम्प यांनी सूचक विधान केले. कदाचित आपण अत्यंत धोकादायक प्रवासात होतो. पण एक लक्षात ठेवा, जर मला काही झाले असते तर तुम्हीही माझ्यासोबतच गेला असता, बरोबर ना? असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला.
इराणने दिलेली धमकी
इराण आणि अमेरिकेमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. तुर्कीयेची सीमा इराणला लागून असल्याने सुरक्षेचा धोका अधिक वाढला होता. इराणमधील काही कट्टरपंथी लोकांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाचे शवपेटीतील चित्रे असलेले फलक लावून ‘खून का बदला खून से’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैन्याला सिक्रेट मिशन राबवावे लागले. दरम्यान, याआधी 2000 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनाही मुख्य विमानाऐवजी दुसऱ्या अज्ञात विमानाने बाहेर नेण्यात आले होते.

























































