
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आज बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला. हातात निळे ध्वज, डोक्यावर निळी टोपी घालून मोर्चा आपल्या मागण्यांसह आयुक्तालयावर पोहोचला. क्रांतीचौक येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व आंनदराज आंबेडकर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा विजय असो, जय भिम, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, उपवर्गीकरण आरक्षणाचा डाव उधळून लावा, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अनुसूचित जातीचे आरक्षण संपविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन सुरू करण्यात आले. बुधवारी क्रांतीचौक येथे दुपारी १ वाजता आंनदराज आंबेडकर यांचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा विजय असो, जय भीम असे नारे देत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव उधळून लावा या घोषणा देत मोर्चा निघाला. मोर्चात हजारोच्या संख्येने जनता सहभागी झाली होती. सिल्लेखाना चौक, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, किलेअर्क, रंगीन दरवाजा मार्गे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
आरक्षण उपवर्गीकरणविरोधी मोर्चासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, पोलीस जमादार, पोलीस शिपाई, महिला पोलीस, तसेच क्यूआरटी पथक उपस्थित होते.
स्वयंसेवकांवर स्वतंत्र जबाबदारी
मोर्चाच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक स्वयंसेवकाला विशिष्ट ओळखपत्र देण्यात आले होते. स्वयंसेवक मोर्चाची शिस्त कायम ठेवण्यासाठी सतर्क होते. पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या.





























































