
‘हर घर तिरंगा’ हा हिंदुस्थान सरकारचा एक देशव्यापी उपक्रम आहे. यंदा याचा पाचवा टप्पा 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत साजरा केला जात आहे. हिंदुस्थानच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त नागरिकांना आपल्या घरावर व कार्यालयांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाच्या निमित्ताने आपल्या मुंबईत ‘देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. 14 ते 16 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता एनएमआयसी, एनएफडीसी-एफडी कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम-2, पेडर रोड येथे होणार आहे. या वेळी कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि अभिनेता शरद केळकर उपस्थित राहणार आहेत.
एनएफडीसी-एनएमआयसी आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात देशभक्तीपर गाजलेले चित्रपट, ऐतिहासिक घटनांवरील चित्रपट, तसेच माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य, त्याग आणि बलिदान, तसेच आधुनिक हिंदुस्थानच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या वीरांना या माध्यमातून चित्रपटांच्या पडद्यावर आदरांजली वाहण्यात येणार आहे.या प्रेरणादायी चित्रपट महोत्सवाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेश विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.






























































