
गणेशोत्सव अवघ्या सवा महिन्यावर आला असताना मुंबईतील धोकादायक पुलांमुळे बाप्पाच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर विघ्न निर्माण झाले आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, मजबुतीकरण करावे आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समन्वय समिती मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडे केली आहे.
धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. यासंदर्भात समितीने मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.





























































