भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा माळशेजमधील पॉवर प्रोजेक्ट हटवा अदानी हटाव, सह्याद्री बचाव; मुरबाड जुन्नरमधील हजारो शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माळशेज येथील प्रस्तावित अदानी कंपनीच्या पॉवर प्रोजेक्टला भूमिपुत्रांचा जोरदार विरोध सुरू झाला आहे. भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून कल्याण अहिल्यानगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. ‘अदानी हटव, सह्याद्री बचाव ‘ची जोरदार घोषणा देत मुरबाड, जुन्नरमधील हजारो आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.

भाजप, शिंदे गटाविरोधात संताप
मुरबाड तालुक्यातील ५५ गावे आणि साडेचारशे हेक्टर जमीन प्रकल्पबाधित होत असून येथील शेकडो अदिवासी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. असे असतानादेखील भाजप आणि शिंदे गट हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसल्याचा संताप मोर्चाचे नेतृत्व करणारे देवराम लांडे यांनी व्यक्त केला. भाजप आणि शिंदे गटाला फक्त आदिवासींची मते पाहिजेत. तुम्ही आंदोलनात सहभागी होत नसला तरी तुमच्या शिवाय आम्ही अदानींचा पॉवर प्रोजेक्ट हाणून पाडू, असा इशारा लांडे यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना दिला.

प्रस्तावित अदानी विद्युत प्रकल्पात मुरबाड तालुक्यातील ५५ तर पुणे जिल्ह्यातील २४ गावे बाधित होणार आहेत. तरीही केंद्र आणि राज्य सरकार अदानी उद्योग समूहाला खूश करण्यासाठी भूमिपुत्रांचा आणि निसर्गाचा बळी देत आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणाला आणि आदिवासींच्या नैसर्गिक अधिवासाला होणाऱ्या धोक्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू झाले आहे.

या आंदोलनाला नागरिक आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून भूमिपुत्राना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललेल्या अदानी विद्युत प्रकल्पाच्या विरोधात कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मढ पारगाव येथे ‘रस्ता रोको’ करण्यात आला. आंदोलकांनी हायवेवर ठिय्या देत भरपावसात दोन तास रस्ता रोको केला. यावेळी मुरबाड व जुन्नरमधील प्रकल्पबाधित गावातील हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.