एअर इंडियाचे आणखी दोन पायलट ड्रग्ज चाचणीमध्ये पॉझिटिव्ह; अंतिम अहवालाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाच्या आणखी दोन वैमानिकांच्या प्राथमिक ड्रग्ज चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही वैमानिकांना खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने ड्युटी आणि उड्डाण यादीतून हटवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या अंतिम चाचणी अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दोन्ही वैमानिकांच्या अंतिम चाचणी अहवालासाठी 24 ते 48 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या दोन्ही वैमानिकांवर कोणती कारवाई करायची, हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या 300 हून अधिक वैमानिकांची ड्रग्ज चाचणी करण्यात आली आहे.

 

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार फुकेट-दिल्ली विमानाच्या घटनेनंतर एअर इंडियाने आपल्या सर्व वैमानिकांची ड्रग्ज चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही विमान कंपन्यांमध्ये मिळून 5 हजारांहून अधिक वैमानिक कार्यरत आहेत. सध्याच्या विमान वाहतूक नियमांमध्ये प्रतिबंधित असलेल्या पदार्थांसह अमली पदार्थांच्या सेवनाचीही या चाचण्यांमध्ये तपासणी केली जात आहे. यापूर्वी फुकेट-दिल्ली मार्गावरील एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला 4 ऑगस्टला ट्रब्युलन्सचा सामना करावा लागला होता. या घटनेदरम्यान विमान अचानक सुमारे 300 फूट खाली आले होते. या घटनेत 24 प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर विमानाच्या मुख्य वैमानिकाची ड्रग्ज चाचणी करण्यात आली होती आणि त्यात गांजाचे सेवन आढळल्याचे समोर आले होते.

 

या घटनेनंतर एअर इंडियाने आपल्या वैमानिकांच्या ड्रग्ज चाचण्या अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. गुरुग्राममधील प्रशिक्षण सत्रांदरम्यान, उड्डाणानंतरच्या माहिती केंद्रांमध्ये, कंपनीच्या कार्यालयांमध्ये तसेच संबंधित तळांवर या चाचण्या केल्या जात आहेत. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रवासी, भागधारक आणि सर्वसामान्यांचा विश्वास कायम ठेवण्यासोबतच विमान वाहतुकीतील उच्च सुरक्षा मानके सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता आणखी दोन वैमानिकांच्या प्राथमिक चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एअर इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अंतिम चाचणी अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.