
माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असलेली खानपान सेवा अतिशय अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाची आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्यांनी व्हीजेटीआयच्या संचालकांना पत्र पाठवले असून विद्यार्थ्यांना तातडीने स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
व्हीजेटीआय ही देशातील नामांकित अभियांत्रिकी शिक्षण संस्था असून गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळत असल्याने मुंबईबाहेरील अनेक गुणवंत विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. वसतिगृहात राहणाऱया या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आरोग्यदायी आणि दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. मात्र मेसमधील अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विद्यार्थ्यांकडून युवासेनेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी मेसची पाहणी केली असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने अहवालाची प्रतीक्षा न करता तातडीने मेस व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी युवासेनेने व्हीजेटीआयचे संचालक डॉ. सचिन कोरे यांच्याकडे केली.
सत्यशोधक समिती लावण्याची मागणी
युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मेसची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली असता संचालक डॉ. कोरे यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही तक्रार मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे देऊन सत्यशोधक समिती लावण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परम यादव, राजन कोळंबेकर यांनी दिली.


























































