अर्धशतक ठोकताच नितीश राणा ढसाढसा रडला; पंच व इतर खेळाडूंनी सावरलं, मैदानात नक्की काय घडलं? कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीमध्ये सध्या दिल्ली प्रीमियर लीगची धूम सुरू आहे. सोमवारी दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि पश्चिम दिल्ली लायन्स संघामध्ये सामना रंगला. या लढतीत दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने पश्चिम दिल्ली लायन्सचा 10 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला. जवळपास एकतर्फी झालेल्या या सामन्यापेक्षा सध्या दिल्ली लायन्सचा स्टार फलंदाज आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटू नितीश राणा याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या सामन्यावेळी नितीश राणा याचे भावुक रूप मैदानावर पाहायला मिळाले. अर्धशतक ठोकल्यानंतर नितीश राणा ढसाढसा रडला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नितीश राणा याने सोमवारी अवघ्या 27 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. पश्चिम दिल्ली लायन्सच्या डावातील नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत नितीशने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक पूर्ण होताच त्याने आकाशाकडे पाहिले आणि आपली दिवंगत आई सतीश राणा यांना ही खेळी समर्पित केली.

नितीश राणा याच्या आईचे दहा दिवसांपूर्वी (7 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ नितीशने या सामन्यात पाठीवर ‘N Satish’ असे नाव असलेली खास जर्सी परिधान केली होती. अर्धशतकानंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी मैदानावरील पंच आणि विरोधी संघाच्या खेळाडूंनी त्याला सावरले.

दरम्यान, नितीशच्या या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर त्याची पत्नी साची मारवाह हिने, आई नेहमीच तुझ्यासोबत आहे, अशी कमेंट करत त्याचे सांत्वन केले.

दरम्यान, या सामन्यात पश्चिम दिल्ली लायन्सकडून नितीश राणाने झुंजार खेळी केली. त्याने 33 चेंडूंत 4 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 60 धावा चोपल्या. सलामीवीर अंकित कुमार स्वस्तात बाद झाल्यानंतर नितीश राणा आणि क्रिश यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र, नितीश बाद झाला आणि दिल्ली लायसन्सचा डाव गडगडला.

नितीशपाठोपाठ क्रिश यादवही 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयुष दोसेजाने 27 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सच्या अंशुमन हुड्डाच्या 4 बळी घेतले, तर विवेक तिवारीने 2 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. दोघांच्या घातक गोलंदाजीच्या बळावर दिल्लीचा संपूर्ण संघ 169 धावांवर बाद झाला.