
हिंदुस्थानी रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांच्या नुकत्याच आलेल्या अहवालात अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालानुसार, देशातील तब्बल ८९ टक्क्यांहून अधिक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या किमान मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अनेक स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणारा ई-कोलाय हा बॅक्टेरिया आढळून आला आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीतील लेखापरीक्षणाचे निष्कर्ष मांडण्यात आले असून, रेल्वेच्या स्वच्छतेवर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
CAG ने देशातील ५,९०० हून अधिक रेल्वे स्थानकांपैकी ५१२ स्थानकांची पाहणी केली होती. त्यापैकी केवळ ५४ स्थानके अशी होती जिथे किमान आवश्यक सुविधांचे सर्व निकष पूर्ण केले गेले होते. पाहणी केलेल्या बहुतांश स्थानकांवर बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पंखे, मार्गदर्शक फलक, पिण्याच्या पाण्याचे पुरेसे नळ आणि कचऱ्याचे डबे यांसारख्या साध्या गोष्टींचीही वानवा असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वर्षाला ७१० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी दिल्ली, हावडा, हजरत निजामुद्दीन, सिकंदराबाद, चेन्नई सेंट्रल आणि अहमदाबाद यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही या सुविधांचा बोजवारा उडालेला दिसला. यासोबतच दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांमध्येही अनेक त्रुटी असल्याचे आणि प्रवासी सुविधांशी संबंधित ५९ टक्के कामे निर्धारित वेळेत पूर्णच न झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुविधांसाठी मंजूर झालेल्या निधीचाही पूर्णपणे वापर न झाल्याने प्रवाशांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘द वायर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या अशाच एका ऑडिटनंतर रेल्वे मंत्रालयाने सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एका दशकानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही, यावर CAG ने ताशेरे ओढले आहेत.




























































