मुलांशी खोटे बोलू नका, दिल्ली पोलिसांच्या कारवाईच्या कौतुकावरून राहुल गांधींची किरेन रिजिजू यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतेच कौतुक केले होते. यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकार आणि किरेन रिजिजू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “या देशातील मुलांशी खोटे बोलू नका. त्यांनाही डोळे आहेत आणि त्यांच्याकडे आठवणीही आहेत,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

X वर एक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, “मोदी सरकारचे मंत्री म्हणत आहेत की, दिल्ली पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. मात्र संसदेपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवण्यात आल्या आणि खिळे लावलेल्या लाठ्या वापरल्या गेल्या. या मारहाणीत एका मुलाचा डोळा गेला, तर एका मुलीचा कान. या क्रूरतेचे आपण कौतुक करायचे का?”

मी स्वतः जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली असून, संपूर्ण देशाने या अत्याचाराचे हजारो व्हिडीओ पाहिले आहेत, असे ते म्हणाले. सरकारवर असत्य आणि हिंसाचाराचा वापर करत असल्याचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले, “या सरकारचा मूळ मंत्रच असत्य आणि हिंसा हा आहे. आधी मुलांना लाठ्या-काठ्यांनी मारायचे आणि नंतर तिथे काही झालेच नाही, असा दावा करायचा.”

या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट हल्ला चढवला. “संपूर्ण अधिवेशनात बेपत्ता असलेले अमित शहा विरोधकांपासून पळ काढत राहिले. आणि पंतप्रधानांनी आजतागायत या विद्यार्थ्यांची माफी मागितलेली नाही,” असे ते म्हणाले. तसेच, “जे लोक स्वतःच्या चुका पाहत नाहीत आणि त्या मान्यही करत नाहीत, अशा लोकांपासून या देशाला सर्वात मोठा धोका आहे,” असा घणाघात त्यांनी केला.