
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेतून 50 कोटी देण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी 2024 साली 50 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. त्यातून सिंदखेडराजा जवळील जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. आजवर या कामांसाठी 27 कोटींचा निधी खर्च झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाडय़ातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून 50 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निधीतून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मारक तसेच या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या सोयीसुविधांचा विकास केला जाणार आहे. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागवून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात येणार असून, लवकरात लवकर या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.





























































