
केरळममधील अल्लाप्पुझा येथे एका 68 वर्षीय वृद्धाच्या हत्येची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला हा दरोड्याचा प्रकार वाटत होता, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणाचा मास्टरमाइंड एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुलगी मृताचीच जवळची नातेवाईक असून तिने आपल्या 17 वर्षीय प्रियकराच्या मदतीने हा कट रचला होता.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, शिवकुट्टी चेट्टियार (68) असे मृत वृद्धाचे नाव आहे. घरात कोणी नसताना आरोपींनी शिवकुट्टी यांची हत्या करून त्यांचे सगळे सोन्याचे दागिने आणि घरातील ऐवज लंपास केले होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या हेतूने झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि कुटुंबियाची चौकशी सुरू केली. यावेळी घरातील एका 13 वर्षीय मुलीचा जबाब नोंदवताना पोलिसांना विसंगती आढळली. ज्यामुळे त्यांचा संशय बळावला. या अल्पवयीन मुलीने आपल्या 17 वर्षीय प्रियकर आणि दोन इतर मित्रांच्या सहाय्याने या व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराला बाईक आणि मुलीला आयफोन खरेदी करण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी हा गुन्हा घडवून आणण्यात आला. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराला घराची संपूर्ण माहिती दिली होती. यानंतर शनिवारी प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांची वृद्धासोबत झटापट झाली आणि त्यांनी वृद्धाचे हात-पाय बांधून गळा आवळला. यावेळी जीव गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून मृतदेह सुद्धा दाखवला होता.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मिरची पावडर पसरवली होती, जेणेकरून श्वान पथकाला माग काढता येऊ नये. या गुन्ह्यादरम्यान 4.5 सोव्हरिन सोने (36 ग्रॅम) आरोपी मुलांनी लंपास केले. त्यापैकी आर्धे सोने विकूनही टाकले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले असून सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यावेळी झालेल्या चौकशीदरम्यान मृत वृद्धाने अल्पवयीन मुलीसोबत अयोग्य वर्तन केल्यामुळे तिने हा कट रचल्याचे पोलिसांना सांगितले.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून यासंपूर्ण प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे.


























































