Pune Crime – जुन्नरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण; विशेष अधिवेशन बोलावून ‘शक्ती’ कायदा अमलात आणा – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका 9 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना मंगळवारी घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. काल जुन्नरमधील पिंपळवंडी गावात घडलेली ९ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवरील अत्याचार आणि खुनाची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, यादृष्टीने पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, अशा नराधम विकृतीला कठोरपणे आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता तरी जागे झाले पाहिजे. यासाठी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून ‘#शक्ती’ कायदा तातडीने अमलात आणावा, अशी आग्रही विनंतीही त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.