
क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. जोपर्यंत बिले वेळेवर भरली जातात, तोपर्यंत त्यांचा वापर फायद्याचा ठरतो.मात्र, बिल भरायला विसरलात, तर मोठा भूर्दंड सोसावा लागू शकतो. असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. एका क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने फक्त ४६ पैशांचे बिल चुकवल्यामुळे त्याला २,६००% दंड भरावा लागला.
रिझर्व्ह बँकेच्या क्रेडिट कार्ड विलंब शुल्कासंबंधीच्या नियमांनुसार, विलंब शुल्क हे बिल भरण्याच्या अंतिम तारखेनंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवरच आकारले जावे, एकूण देय रकमेवर नाही, असा नियम आहे. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, एका क्रेडिट कार्डधारकाने दावा केला की त्याचे क्रेडिट कार्ड बिल १०,६४९.४६ रुपये होते. परंतु पैसे भरण्याच्या शेवटच्या दिवशी, त्याच्याकडे फक्त ४६ पैसे कमी पडले. या तुटीमुळे, क्रेडिट कार्ड कंपनीने २,६००% इतका मोठे विलंब शुल्क आकारले. त्यामुळे त्याला ४६ पैशांऐवजी १,२०० रुपये भरावे लागले.
या प्रकरणामुळे क्रेडिट कार्ड फसवणुकीवरील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि इतक्या कमी रकमेच्या थकबाकीची हाताळणी कशी केली जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या आकड्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मध्यवर्ती बँकेने सर्व बँकांना ठेवींवरील व्याज आणि कर्जावरील व्याजासह सर्व व्यवहार जवळच्या रुपयापर्यंत पूर्णांकित करण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या मते, ५० पैशांपेक्षा कमी असलेले अपूर्णांक विचारात घेतले जाऊ नयेत. या तत्त्वानुसार, ₹१०,६४९.४६ हे ₹१०,६४९ असे पूर्णांकित केले पाहिजे, तर ₹१०,६४९.५० हे ₹१०,६५० असे पूर्णांकित केले पाहिजे.
क्रेडिट कार्डांवरील विलंब शुल्काबाबत आरबीआयचे स्वतंत्र नियम देखील आहेत. क्रेडिट कार्ड मार्गदर्शक तत्त्वांनुसार, क्रेडिट कार्ड जारी करणारी संस्था एखादे खाते थकीत म्हणून तेव्हाच नोंदवू शकते किंवा विलंब शुल्क आकारू शकते, जेव्हा खाते तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत असेल. आरबीआयच्या नियमानुसार, विलंब शुल्क आणि इतर संबंधित शुल्क केवळ बिल भरण्याच्या अंतिम मुदतीनंतरच्या थकबाकीच्या रकमेवर आकारले जावेत, एकूण देय रकमेवर नाही.
क्रेडिट कार्ड बिलांवरील पूर्णांकीकरणाचे नियम आणि विलंब शुल्काचे नियम व्यवहारांच्या दोन वेगवेगळ्या पैलूंना संबोधित करतात. पहिला भाग रुपयाच्या अपूर्णांकांचा समावेश असलेल्या रकमा कशा पूर्णांकित केल्या जातात याच्याशी संबंधित आहे, तर दुसरा भाग विलंब शुल्क केव्हा आणि कोणत्या रकमेवर आकारले जाऊ शकते हे स्पष्ट करतो. अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे अनुभव सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.



























































