
ना निसर्गाचं भान, ना कायद्याची भीती! पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबा घाटात दोन हुल्लडबाज तरुणांनी दारूच्या नशेत तुफान ‘झिंगाट तमाशा’ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात गाड्या अडवणे, वाहनांवर तुफान दगडफेक करणे आणि पर्यटकांना अश्लील शिवीगाळ करत रस्त्यातच लोळणे, असा भयंकर प्रकार या तळीरामांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दारूच्या प्रचंड नशेत असलेल्या या दोन तरुणांनी आंबा घाटातील ऐन वळणावर, वाहतुकीच्या मधोमध पडून थेट लोळायला सुरुवात केली. जो वाहनचालक त्यांना बाजूला सरकण्यास सांगेल किंवा गाडी थांबवेल, त्याच्यावर हे तरुण थेट दगड भिरकावत होते. मदतीला येणाऱ्या किंवा समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या हुल्लडबाजांनी अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.
आंबा घाटासारख्या महत्त्वाच्या आणि नेहमी गजबजलेल्या मार्गावर जर असे प्रकार घडत असतील, तर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या ‘तमाशा’ करणाऱ्या तरुणांवर पोलीस प्रशासन काय आणि कधी कडक कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करून घाटातील गस्त वाढवण्याची जोरदार मागणी आता नागरिक करत आहेत.




























































