
पेरू खाण्याच्या बहाण्याने १० वर्षांच्या मुलीला शेतात नेऊन अत्याचार करून नराधमाने गळा दाबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नसरापूरची पुनरावृत्ती झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपी पांग्या ऊर्फ साहिल खैरे (२५) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आजारी असल्याने मंगळवारी दुपारी घरीच टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी नराधमाने तिला पेरू देण्याच्या, तसेच सायकल शिकवण्याच्या बहाण्याने सायकलवर बसवून नेले. घरापासून दीड किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतानजीक ओढ्यालगत त्याने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पसार झाला. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक तपास करत असताना, मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय मुलासोबत तिला पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अत्याचार करून खून केल्याची कबुली दिली.
१५ दिवसांत चार्जशीट दाखल करणार
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळवंडी गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करून नराधम आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिले.
पोलिसांसोबतच फिरत होता आरोपी!
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी आरोपी मदत करण्याच्या बहाण्याने पोलीस पथकासोबत फिरत होता. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
खटला जलदगती न्यायालयात चालवणार – सुनेत्रा पवार
“पिंपळवंडी येथील घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नराधम आरोपीला शिक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे,” असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.


























































