
विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये नोंदणी उपक्रमादरम्यान जोरदार हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवल्याने मोठा संघर्ष टळला. मुंबईत सध्या विविध विद्यार्थी संघटनांकडून सदस्य नोंदणीसाठी कॉलेज परिसरात स्टॉल लावले जात आहेत. विद्यार्थ्यांना आपापल्या संघटनेचे महत्त्व सांगून सदस्य बनवून घेतले जात आहे. यानुसार ‘मनसे’ने साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन कॉलेजच्या गेटपासून 200 मीटर अंतरावर स्टॉल लावला होता. याचवेळी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनीही परवानगी घेऊन स्टॉल लावला होता. मात्र स्टॉलजवळ एका इमारतीचे काम सुरू असल्याने त्यांनी आपला स्टॉल ‘मनसे’च्या स्टॉलजवळ लावला. यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, काही वेळातच दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून वाद मिटवला.


























































