
नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि बॅरिकेड्सवर गुरुवारी प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर फिरवला. ही बांधकामे अनधिकृतरित्य बांधण्यात आल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने इस्लामाबादमधील हिंदुस्थानी दुतावासाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड्स आणि पार्किंगचे पोल हटवले होते; हिंदुस्थानने ही कारवाई करत पाकिस्तानला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.
स्थानिक प्रशासनाने बुलडोझरच्या साहाय्याने पाकिस्तानी दूतावासाबाहेरील गल्लीत उभारलेली बांधकामे आणि रांगेच्या व्यवस्थापनासाठी उभारलेले बॅरिकेड्स हटवले. यामध्ये व्हिसा विभागाबाहेरील पत्र्याचे शेड, पांढऱ्या रंगाचे लोखंडी रेलिंग, गेट्स आणि इतर तात्पुरती बांधकामे तोडण्यात आली. घटनास्थळी विटा, काँक्रीटचे तुकडे, तुटलेले लोखंडी सांगाडे आणि पत्र्यांचा ढिगारा पसरल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईनंतरही ‘Window 1’, ‘Pakistani Passport Only’ आणि ‘Window-5 / Collection of Visa Applications’ असे फलक असलेल्या खिडक्या मलब्यामध्ये स्पष्ट दिसत होत्या. उच्चायुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार, पांढऱ्या भिंती, घुमट आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह असलेले मोठे गेट मात्र सुरक्षित असून या कारवाईचा मुख्य इमारतीवर कोणताही परिणाम झालेला नाही.




























































