
मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आसाम रायफल्स आणि बोरोबेकरा पोलिसांनी बराक नदीच्या परिसरात केलेल्या एका संयुक्त कारवाईत तब्बल 27.28 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून सहा तस्करांना अटक केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुपिधार परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बराक नदीच्या परिसरात एक बोट संशयास्पद स्थितीत जात असल्याचे आसाम रायफल्सच्या जवानांच्या निदर्शनास आले. जवानांनी बोटीला थांबण्याचा इशारा दिला असता, बोटीतील सहा जणांनी नदीत उड्या मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार आणि अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थिती होती. अशातच सुरक्षा दलांनी तातडीने पाठलाग करत त्यांचे पळून जाण्याचे सर्व संभाव्य मार्ग बंद केले आणि सहाही जणांना शिताफीने ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर बोटीची कसून झडती घेतली असता त्यामध्ये 9.414 किलो वजनाच्या तब्बल 90 हजार ‘याबा’ गोळ्या आढळून आल्या, ज्याची बाजारातील अंदाजित किंमत सुमारे 27 कोटी रुपये आहे. यासोबतच संयुक्त पथकाने चार साबणाच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवलेले 28.8८ लाख रुपये किमतीचे 48 ग्रॅम हेरॉईनही जप्त केले आहे. अमली पदार्थांव्यतिरिक्त सहा मोबाईल फोन, चार साईड बॅग आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली गावठी बोटही जप्त करण्यात आली आहे. हा अवैध माल मिझोरामहून बराक नदीमार्गे आसामला नेला जात असावा, असा प्राथमिक संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व संशयितांना आणि जप्त करण्यात आलेला संपूर्ण मुद्देमाल बोरोबेकरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

























































