
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका शासकीय माध्यमिक शाळेत शिक्षक आणि महिला अतिथी शिक्षिकेने वर्ग वेळेपूर्वीच सोडून प्रेमाचे धडे गिरवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत दोन्ही शिक्षकांची त्या शाळेतून बदली केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नारदेव विकासखंडातील ‘बीच बहरी’ गावातील शासकीय माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दोन्ही शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली होती. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही शिक्षक ठरवलेल्या वेळेआधीच वर्ग संपवून मुलांना बाहेर काढत असत. यानंतरचा बहुतांश वेळ ते दोघे एकत्रच घालवत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक विभागाचे सहाय्यक आयुक्त सत्येंद्र सिंह मरकाम यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.चौकशी समितीच्या अहवालानंतर प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना तात्काळ त्या शाळेतून हटवले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नवीन अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, दोन्ही शिक्षकांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय किंवा आपसातल्या वादातून आपल्याला बदनाम केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, वेटिंग लिस्टवरील अन्य एका व्यक्तीला ही नोकरी मिळवून देण्यासाठी काही लोकांनी विद्यार्थ्यांचा गैरवापर करून हा बनाव रचला आहे, असे महिला शिक्षिकेने म्हटले आहे.


























































