भटकंती- नयनरम्य त्रिपुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. वर्षा चोपडे

निसर्गात रममाण होत धार्मिक आणि वारसा पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी त्रिपुरा हे अगदी योग्य ठिकाण. त्रिपुराच्या इतिहासात विविध राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा समावेश असलेल्या अनेक पर्यटनस्थळांची ही भटकंती अनुभवायलाच हवी.

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. हिरवीगार खोरे आणि टेकड्यांनी नटलेले हे राज्य अतिशय नयनरम्य आहे. आगरतला ही त्रिपुरा राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. त्रिपुरा हे नाव हिंदू देवी त्रिपुरा सुंदरीवरून पडले. उदयपूर येथे त्रिपुरातील ‘माताबारी’ नावाने प्रसिद्ध असलेले देवालय आहे. येथील त्रिपुरा सुंदरी मंदिराची प्रमुख देवता एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह हा विश्वातील पहिला ‘प्रेमविवाह’ म्हणून साजरा केला जातो.

 आज हे मंदिर पवित्र शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, याच ठिकाणी देवी सतीचा उजवा पाय पडला होता. शतकानुशतके हे मंदिर पूर्व भारतातील शक्ती उपासनेचे एक प्रभावी केंद्र राहिले आहे. हे मंदिर त्रिपुरा आणि चंद्रनाथ मंदिर बांगलादेश या आध्यात्मिक क्षेत्रांना जोडणारा एक पवित्र दुवा. महाराज धन्य माणिक्य यांनी 1501 मध्ये त्रिपुरा सुंदरी मंदिराची स्थापना केली. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हिंदू पौराणिक कथांनुसार, ‘पीठस्थान’ म्हणजे अशी ठिकाणे जिथे देवी सतीचे शरीराचे भाग पडले होते. पीठमाला ग्रंथानुसार सार, भगवान शिवाच्या तांडव नृत्यादरम्यान सतीचा उजवा पाय येथे पडला होता. ही सर्व माहिती मंदिरातील हस्तलिखितांमधून गोळा करण्यात आली होती, परंतु काळाच्या ओघात ही हस्तलिखिते नष्ट झाली आहेत. या मंदिराची उंची 75 फूट असून त्याच्या चार कोपऱ्यांवर चार भव्य स्तंभ आहेत. मंदिराचे छत बौद्ध वास्तुकलेच्या शैलीत बांधलेले आहे.

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही धर्माचे लोक श्री श्री माता त्रिपुरा सुंदरीची पूजा करू शकतात. 18 व्या शतकाच्या मध्यावर समशेर गाझीने उदयपूरवर आक्रमण करून ते जिंकून घेतले होते. समशेर गाझीचे चरित्र असलेल्या ‘गाझीनामा’मध्ये असा उल्लेख आढळतो की, गाझीने स्वत: देवी त्रिपुरा सुंदरीची पूजा केली होती. मंदिराच्या व्यवस्थापन समितीमध्येही विविध धर्म, संस्कृती आणि क्षेत्रांतील लोकांचा समावेश असतो. उदयपूरमधील मुस्लिम बांधवही आपली पहिली पिके आणि दूध देवी त्रिपुरा सुंदरीला अर्पण करतात, अशी येथील प्रथा आहे. काही तासांच्या अंतरावर निसर्गरम्य शिवाची भव्य पाषाण-शिल्पे बघणे आनंददायी अनुभव ठरतो. उनाकोटी हे नाव उनाकोटी टेकडीवरून आले आहे. बंगाली भाषेत ‘उनाकोटी’चा शाब्दिक अर्थ ‘कोटीपेक्षा एक कमी’ अर्थात एक कोटीला एक कमी असा होतो. येथे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन शैव उपासना स्थळ असून तिथे शिवाची भव्य पाषाण-शिल्पे (रॉक रिलीफ्स) कोरलेली आहेत. येथील खडकांवरील कोरीव काम आणि प्राचीन अवशेष ही त्रिपुरातील सर्वात प्रसिद्ध व पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेली पर्यटन स्थळ आहे.

येथील देवतांच्या पाषाण-मूर्ती आणि खडकांवरील कोरीव काम सातव्या ते नवव्या शतकातील आहेत. उनाकोटी टेकडीच्या निर्मितीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्या सर्व भगवान शंकराशी संबंधित आहेत. परंतु स्थानिक आदिवासींचा असा विश्वास आहे की, या मूर्तींचे शिल्पकार ‘कल्लू गुर्जर’ होते. ते पार्वतीचे भक्त होते आणि शिव-पार्वतीसोबत त्यांच्या कैलास पर्वतावरील निवासस्थानी जाऊ इच्छित होते. त्यासाठी एक अट घातली ती अशी होती की, त्याला एका रात्रीत शिवाची एक कोटी रूपे मूर्तिरूपात तयार करावी लागतील. कल्लू पूर्ण निष्ठेने या कामात मग्न झाला, परंतु पहाट झाली तेव्हा मूर्तींची संख्या एक कोटीपेक्षा एकने कमी म्हणजेच ‘उनकोटी’ भरली. कल्लूची सुटका करून घेण्याच्या उद्देशाने भगवान शिवाने हेच कारण पुढे केले आणि त्याला मूर्तींसह ‘उनकोटी’ येथेच सोडून स्वत: पुढे निघून गेले.

 उनाकोटी व उदयपूर दीड तासाचे अंतर आहे. त्रिपुरा या पूर्वीच्या संस्थानावर माणिक्य घराण्यातील महाराजांचे राज्य होते. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळातही हे एक स्वतंत्र प्रशासकीय एकक होते. त्रिपुराचा शाही इतिहास सांगणाऱ्या ‘राजमाला’ या ग्रंथानुसार, 15 ऑक्टोबर 1949 रोजी भारतीय संघराज्यात विलीन होण्यापूर्वी या राज्यावर एकूण 184 राजांनी राज्य केले. तेव्हापासून त्रिपुराच्या इतिहासात विविध राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा समावेश राहिला आहे. उज्जयनंत पॅलेस, नीरमहल पॅलेस, सेपाहिजाला वन्यजीव अभयारण्य ही ठिकाणेही बघण्यासारखी आहेत. पर्यटनवेड्यांसाठी ही स्थळे पर्वणीच आहेत. खरे तर ‘सारे जहाँ से अच्छा’ असलेला आपला देश बघून नक्कीच अभिमान वाटेल.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळम येथे नियुक्त आहेत.)

[email protected]