
मुंबईतील मैदाने आणि भूखंड वाचवण्यासाठी उद्या 23 ऑगस्ट रोजी वांद्र्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार तिरंगा आंदोलन करण्यात येणार आहे. वांद्रे रंगशारदा येथील नेव्हील डिसोझा फुटबॉल ग्राऊंड येथे होणाऱ्या आंदोलनाला शिवसेनेसह इतर पक्ष, सामाजिक संघटना, मुंबईकर मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन होईल. आंदोलनात भूखंड ढापाढापीचा निषेध करून भाजपला ‘रेड कार्ड’ दाखवण्यात येणार आहे.
मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डर-पंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा हल्ला आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुलुंडमधील स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या जागी पेट्रोल पंपाचे आरक्षण दाखवून ही जागाही ढापून आपल्या मित्रांना द्यायचे मुख्यमंत्र्यांचे कारस्थान असल्याचे त्यांनी जागेच्या पाहणीनंतर बोलताना सांगितले. या ठिकाणी मोकळे मैदान आणि गॅस स्टेशन तसेच ठेवून मैदान वाचवले जाऊ शकते, असे ते म्हणाले. भाजपने गेल्या चार वर्षांत मुंबईतील सुमारे 18 मैदाने आपल्या बिल्डर-पंत्राटदार मित्रांच्या घशात घातली आहेत. आम्ही सत्तेत असताना पालिकेच्या माध्यमातून अंधेरीत छत्रपती शिवाजी महाराज संकुल दहा वर्षांपूर्वी बनवले आहे. या ठिकाणी मोकळे मैदान, क्रिकेट मैदान आणि सायकलिंग-वॉकिंग ट्रक आहे. हे सर्व आता भाजपला आपल्या बिल्डर-काँट्रक्टर मित्रांच्या घशात घालायचे आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेना आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते.
भाजपने ‘बेस्ट’चे 22 डेपो बिल्डरांच्या घशात घातले आहेत. आता अंधेरीचा एक प्लॉट आणि जुहूचे दोन प्लॉटही हातात घेऊन बिल्डर-काँट्रक्टर आणायचा डाव आहे. हे असेच सुरू राहिले तर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा उरणार नाही.
…तर मैदानी खेळ होणार कुठे?
‘जेन-झी’विरोधी भाजपने मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डर-काँट्रक्टर मित्रांच्या घशात घालण्याचा सपाटाच लावला आहे. अशाप्रकारे भाजपने मैदाने गायब केली तर मैदानी खेळ होणार कुठे? याविरोधात हा लढा आहे. हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा विषय नाही. त्यामुळे मुंबईकर आणि इतर पक्षांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. या आंदोलनात केवळ तिरंगा झेंडा असेल असेही ते म्हणाले.
भाजप हे भूखंड ढापणार
अंधेरीचे शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल मैदान, जुहूमधील दोन मोकळ्या भूखंडांसह नेव्हील डिसोझा फुटबॉल मैदानाची जागा भाजप पालिकेच्या माध्यमातून लाडक्या पंत्राटदारांच्या घशात घालणार आहे. सगळीकडची मोकळी मैदाने हातात घेऊन भाजपला स्वतःचे बिल्डर आणि कॉण्ट्रक्टर आणायचे आहेत, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.
स्थळ नेव्हील डिसोझा फुटबॉल मैदान
वेळ सायंकाळी 5 वाजता

























































