Gold Silver Rate – आठवड्याभरात सोने चांदीला झळाळी; सोन्याचे दर 7,900 तर चांदीचे दर 10,000 रुपयांनी वधारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका इराण संघर्षामुळे सोने चांदीचे दर दबावाखाली होते. मात्र, आता अमेरिकन फेडच्या बाँडबाबतच्या निर्णयामुळे बाँड इल्ड घसरले आहेत. त्याचा परिणाम डॉलरवरही झाला असून त्याचे मूल्यही घसरले आहे. त्यामुळे सोने चांदीच्या दरांना बळकटी मिळाली आहे.

गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात विविध शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७,९६० ने तर २२-कॅरेट सोन्याच्या दरात ७,३०० ने वाढ झाली आहे. २३ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६३,२४० आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात फ्युचर सोन्याचा भाव प्रति औंस $४६००.९१ आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही या आठवड्यात वाढ झाली आहे. या आठवड्यात चांदीच्या दरात प्रति किलोग्राम जवळपास १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. २३ ऑगस्टच्या सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम २.६० लाख रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस $६९.८७ आहे.

वायदे बाजारातही सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७,००० रुपयांनी आणि चांदीच्या दरात ८,००० रुपयांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.६२ लाख आहे, तर चांदीचा भाव २.४६ लाखांपेक्षा जास्त आहे.

सोने चांदीत दरवाढ झाली असली तरी अजूनही ते त्यांच्या उच्च्यांकापासून स्वस्त आहेत. सोन्याचा भाव त्याच्या १.९३ लाख या विक्रमी उच्चांकापेक्षा ३१,००० ने कमी आहे. तर चांदीच्या भाव त्याच्या उच्च्यांकापेक्षा १.७४ लाखांनी स्वस्त आहे. एमसीएक्सवर चांदीचा विक्रमी उच्चांक ₹४.२० लाख आहे.

या आठवड्यात अमेरिकेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी, दबाव कमी करण्यासाठी आणि वाढते कर्ज कमी करण्यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दीर्घकालीन सरकारी रोख्यांच्या बायबॅकची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर झाला आहे.