
कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात रविवारी पहाटे भारतीय जनता पक्षाच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मेजवानी आयोजित करण्याच्या कारणावरून झालेल्या या वादात एका भाजप कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
आनंदपूर येथील क्रीडांगणावर रविवारी पहाटेच्या सुमारास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनावरून पक्षातीलच दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्याने दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी आणंदपूर पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली.
याप्रकरणी स्थानिक भाजप नेते अरुण बिसवाल यांनी पक्षनेतृत्वाची परवानगी न घेताच या मेजवानीचे आयोजन करण्यात आल्याचा दावा केला आहे. ज्या लोकांनी या मेजवानीचे आयोजन केले होते, ते ४ मे नंतर पक्षात सहभागी झालेले नवखे लोक आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी स्थानिक मच्छी विक्रेते आणि मटण विक्रेते यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले आहेत, असा गंभीर आरोप बिसवाल यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद घेत आनंदपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.


























































