
चुकीच्या दिशेने आलेल्या कारचालकांना हटकणारे मीरा-भाईंदर महापालिकेचे अॅम्ब्युलन्स चालक साईनाथ चव्हाण (४५) यांना कारमधील तरुणांनी शेजारून जाणाऱ्या कंटेनरखाली ढकलून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांची नावे सागर समगीस्कर, सोनुकुमार बघेल, सतीश आसबे आणि राकेश चांदिवडे अशी आहेत.
साईनाथ चव्हाण हे मीरा-भाईंदर महापालिकेत कंत्राटी पद्धतीत रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. ते सोमवारी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी स्कूटरवरून निघाले. मीरा-भाईंदर रोडवर जुना पेट्रोलपंपाच्या दिशेने ते जात असताना पहाटे सुमारे सवादोन वाजता गंधर्व बारसमोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारमधील व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. कारमधील एका व्यक्तीने साईनाथ यांना बेदम मारहाण करत समोरून वेगात येणाऱ्या कंटेनरखाली ढकलून दिले. या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली साईनाथ यांचा चिरडून मृत्यू झाला.
आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे साहेबांना सांगून मी लवकर घरी येईन, असे कुटुंबीयांना सांगून साईनाथ चव्हाण कामावर गेले. परंतु मध्यरात्री घरी परतताना झालेल्या वादात त्यांचा जीव गेला. ते घरी परतलेच नाहीत.






























































