
पार्टटाईम नोकरीवर जात असताना रस्ते अपघातात तेलंगणातील तीन विद्यार्थ्यांचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. फ्लोरिडा येथील ब्रेवर्ड काउंटीमधील पाम बे जवळ इंटरस्टेट 95 वर मंगळवारी हा अपघात घडला. स्थानिक पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांची कार अचानक महामार्गावरून घसरून एका झाडाला धडकली आणि वाहनाला आग लागली. मृतांमध्ये तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील नविपेट येथील रहिवासी एन. राहुल याचा समावेश आहे. राहुल उच्च शिक्षणासाठी सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरिकेला गेला होता. त्याने पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा येथे पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. तो शिक्षणासोबत नोकरीही करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालवणारा विद्यार्थी आणि पुढच्या सीटवरील प्रवासी यांचा जागीच मृत्यू झाला. राहुलचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोन मृत व्यक्तींची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

























































