अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन, पश्चिम रेल्वेवरील 39 खाद्यपदार्थ स्टॉल्स बंद; मुंबई सेंट्रल विभागाची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या स्टॉल्सधारकांवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने धडक कारवाई केली आणि दहा दिवसांत 39 खाद्यपदार्थ स्टॉल्स बंद केले. रेल्वे प्रशासनाने 15 ऑगस्टपासून विशेष स्वच्छता आणि आरोग्य मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये प्रशासनाने अस्वच्छता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांकडून 3.80 लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे स्टॉल्सधारकांचे धाबे दणाणले आहे.

रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर स्वच्छता राखली जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. काही स्थानकांतील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांवर उंदीर फिरताना आढळले होते. त्याची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ‘रेल नीर’ पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण केले जात असल्याने तपासणी सुरू करण्यात आली आहे.