आठवडाभरात थकबाकी भरा अन्यथा मालमत्तांचा लिलाव, कोट्यवधींच्या वसुलीसाठी पालिकेचा अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालमत्ता कर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेतला असून आठवडाभरात थकबाकी भरा अन्यथा मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. विशेषतः महालक्ष्मी, लोअर परळ आणि मालाडमधील काही कंपन्यांकडे कोटय़वधीची थकबाकी असल्याने ती वसूल करण्यासाठी पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार लोअर परळ, महालक्ष्मी आणि मालाड पूर्व येथील व्यावसायिक, निवासी आणि मिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये लोअर परळ येथील अंबिका सिल्क मिल्स कंपनी लिमिटेड या मालमत्तेकडे सुमारे 11.22 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये 6.07 कोटी रुपये कर आणि 5.14 कोटी रुपये दंडाचा समावेश आहे, तर मालाड पूर्व परिसरातील वाडार एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित दोन मालमत्तांवर अनुक्रमे 1.08 कोटी रुपये आणि 1.28 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. तसेच धनजीवाडी येथील आणखी एका अन्य मालमत्तेवर सुमारे 94.26 लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकबाकी दंडासह भरा

 सर्वाधिक थकबाकी महालक्ष्मी येथील रघुवंशी मिल्स लिमिटेड या मालमत्तेवर असून सुमारे 37.32 कोटी रुपयांची देय रक्कम आहे. त्यापैकी 27.71 कोटी रुपये मालमत्ता कर तर 9.60 कोटी रुपये दंडाचा समावेश आहे.

 थकबाकीदारांना दंडासह ही थकबाकी भरावी लागणार आहे. थकबाकी वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888च्या कलम 206 (2) अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.